दुकानदारांचे कमिशन थकले

रायगडात रेशनवाटप बंद होणार
| माणगाव | प्रतिनिधी |
रेशन धान्य वितरणाचे कमिशन संबंधित दुकानदारांना शासनाकडून अद्यापही मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक सहन करावा लागत आहे. शासनाकडे महाराष्ट्रातील 127 कोटी 51,88,982 रुपये तर रायगड जिल्ह्यातील दुकानदरांचे कमिशन 9 कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे शासनांनी हे कमिशन दुकानदारांना अदा न केल्यास रायगडातील रेशन दुकानदारांनी 31 मार्च पासून रेशनवरील धान्यवाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 28 फेब्रुवारी रोजी निवेदन देवून लक्ष वेधणार आल्याची माहिती स्वस्त भाव धान्य रेशनदुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी लोणेरे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

1 जानेवारी 2023 पासून शासनाने मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व रेशनदुकानदार मोफत धान्य वाटप करीत आहेत. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे कमिशन शासन दुकानदारांना अदा करणार होते. मात्र मार्च महिना उजाडला तरीही 2 महिन्याचे कमिशन शासनाकडून दुकानदारांना अदा केले नाही. रेशन दुकानदारांना त्या दुकानाचे लाईट बिल, दुकानभाडे तसेच दुकानात असणार्‍या कामगारांचा खर्च पडत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार आर्थिक संकटात पुरता सापडला आहे. सध्या रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे ते सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्याची मागणी जिल्हा संघटनेने केली. मात्र निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे ह्या काम पहात आहेत. हे कमिशन वेळेत न मिळाल्यास 31 मार्च पासून रेशनवरील धान्य वितरण करणे बंद करून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष घोसळकर यांनी दिला आहे.

जून ते डिसेंबर या 7 महिन्याच्या कालावधीत प्रधानमत्री योजनेतून रेशन दुकानामार्फत लाभार्थांना मोफत गहू व तांदूळ वितरीत करण्यात आले होते. त्या 7 महिन्याचे कमिशन शासनाकडे रायगड जिल्ह्यात 900 कोटी थकले आहेत. तर महाराष्ट्रात 127 कोटी 51,88,982 रुपये शासनाकडे थकले आहेत. हे कमिशन दुकानदाराना अदा करावे या मागणीसाठी 22 मार्च 2023 रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवर उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य व केरोसीन परवाना धारक जनरल सेक्रेटरी कॉ. चंद्रकांत यादव, महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष पुष्पराजकाका देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून या मोर्चात रायगड जिल्ह्यातून या देशव्यापी आंदोलनात सुमारे 500 दुकानदार सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version