। सुतारवाडी । वार्ताहर ।
गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला असून सुतारवाडीसह अन्य परिसरांमध्ये भात लावणीची कामे वेगात सुरू आहेत. यावर्षी ही शेतीच्या कामासाठी मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे.
यावर्षी पाऊस वेळेत सुरू झाल्यामुळे बळीराजांनी नांगरणीची कामे जून महिन्यातच उरकून पेरणी केली होती. जुलै महिन्यात पाऊस नियमितपणे पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाने वेळेत लावणी व्हावी यासाठी जोर धरला आहे. नांगरणीच्या कामासाठी दिवस 500 रु. मजुरी देऊन सुद्धा नांगर्या मिळत नाही. यातच आता ग्रामीण भागातील गुरांचे प्रमाणही फारच कमी झाले असल्यामुळे नांगरणीसाठी बैलांची कमतरता जाणवत होती. तसेच, या परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस आणि रोपवाटिका फार्म असल्यामुळे शेत मजुरी करणारे त्या-त्या ठिकाणी कायमस्वरूपी मोलमजुरीसाठी जात असल्यामुळे स्थानिक विभागांमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे.