कृषी विभागाने लवकरच खतांची उपलब्धता करण्याची मागणी
| उरण | वार्ताहर |
सततच्या पावसामुळे भातशेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतीच्या पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकर्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कृषी विभागाने उरण तालुक्यात खतांची उपलब्धता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील वीस दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीतील भात पिके कुजून गेली होती. शेतकर्यांनी आपली शेती ओसाड पडू नये या करिता अनेक प्रयत्न करीत वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतातून थोडी थोडी रोपे जास्तीचे मंजूर घेऊन आणले आणि त्यातील एक एक काडी शेतात लावण्यात आली आहे. मात्र, आत्ता लावलेल्या रोपाची वाढ होण्यासाठी गरज आहे ती खतांची. मात्र, उरण तालुक्यात कोठेही खत पुरवठा उपलब्ध होत नाही. शेतकर्यांच्या शेतीसाठी अनेक व्हाट्सअप ग्रुपद्वारे त्या त्या गावातील शेतकरी कोठे खते शिल्लक असल्याची माहिती विचारत आहे.
पुर्वी शेतकरी आपल्या गोठ्यातील शेण, गोवर शेतात शेतकरी खत म्हणून वापर करत होते. सध्या गुरेढोरे शिल्लक नसल्याने शेतकरी खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी खतांच्या तुटवड्यामुळे शेतीला बहर येणार नसल्याचे शेतकर्यांकडून बोलले जात आहे. एकंदरीत शेतकर्यांची उरली सुरलेली शेती ही धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.







