आरोग्य केंद्रात मनुष्यबळाचा तुटवडा

नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा प्रशासनाला विसर

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून नव्याने आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष पाठपुरावा करून हे काम पूर्ण केले. परंतु, आजपर्यंत या दवाखान्याचे उद्घाटन झालेले नसून, यामध्ये राजकीय हेतुपरस्सर हा उद्घाटन सोहळा रखडल्याचे बोललं जातं आहे. तसेच मनुष्यबळाचा तुटवडा असून, महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत.

आज आंबेत परिसरात असणाऱ्या नाविवाडी विचारेवाडी, संदेरी, आमशेत, खारगाव, तोराडी, म्हाप्रल, लोकरवन, पडवे, कोकरे, दाभोळ, अशा गावांतील हजारो नागरिकांना या सेवेचा लाभ मिळत असून, आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र स्तरावर पूर्ण सेवा देण्यात येत आहे. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तात्काळ या केंद्राला भेट देत आरोग्य तपासणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर 15 मे 2023 ला तपासणी आणि इतर सुविधा सुरू करण्यात आल्या, त्यानंतर आतापर्यंत एकूण 2200 च्या आसपास रुग्ण तपासणी केवळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, सफाई कर्मचारी, स्त्री परिचर यांच्या सहाय्यावर हे केंद्र चालवण्यात येत आहे. वास्तविक पाहता, आंबेत प्राथमिक केंद्र इमारतीचे काम हे 100 टक्के पूर्ण झालेले असताना शासन स्तरावरून अद्यापही आवश्यक मनुष्यबळ उदा. औषध निर्माण अधिकारी, ओपीडी आरोग्य सेविका, शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी महत्त्वाची पदे न भरता उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या जीवावर रुग्ण सेवा अविरत चालू आहे.
सदर इमारतीमध्ये आठवड्यात पिण्याचं पाणी येत असून, ते नियमित येणे गरजेचे आहे. दवाखान्यात लागणारी आरोग्य रुग्णवाहिका आजपर्यंत उपलब्ध नाही. अशी परिस्थिती असताना आरोग्य विभाग अद्याप झोपेतच असल्याचं दिसून येत आहे. लवकरात लवकर या संदर्भातील विषय मार्गी लावण्यात यावा, अशी विनंती स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या इमारतीचे काम 100 टक्के पूर्ण होऊनदेखील अत्याधुनिक सुविधांची वानवा जाणवत आहे. कर्मचाऱ्यांचादेखील तुटवडा असून, नेमकेच कर्मचारी येथे आरोग्य सुविधा सांभाळत आहेत. आरोग्य विभागाने लवकरात लवकर या पदांची नियुक्ती करून ही सेवा सुरळीत सुरू करावी.

नाविद भाईजान, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version