| पोलादपूर | प्रतिनिधी |
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला सत्ता मिळाली असताना, आता त्याच लाडक्या बहिणी डोईजड झाल्याचे सरकारमधील मंत्र्यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर विधानसभेत सत्ता मिळवली, त्याच बहिणी आता सरकारला तिजोरीवरील भार होत असल्याचे अनेकदा स्पष्ट होत आहे. दरम्यान, मंत्री भरत गोगावलेंनीसुद्धा लाडक्या बहिणीमुळे राज्याकडे पैशांचे शॉर्टेज असल्याचे सांगितले. मंत्र्यांच्या या वक्तव्याने राज्यातील महिलावर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषद, पोलादपूर पंचायत समिती आणि नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठच्या संयुक्त विद्यमाने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 355 व्या शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून ना. गोगावले बोलत होते. 2022च्या शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळयात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून 5 कोटी मंजूर केल्यानंतर 10 कोटी देण्याची घोषणा केली होती. आपण स्वत: लाडक्या बहिणीमुळे राज्याकडे पैशाचे शॉर्टेज असले तरी मुख्यमंत्री महोदयांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत पाठपुरावा करु, अशी ग्वाहीसुद्धा यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी दिप्ती घाट, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, भाजप अध्यक्ष तुकाराम केसरकर, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नरवीरांचे 13वे वंशज रायबा मालुसरे, राजिप उपअभियंता नरेंद्र देशमुख, पोलादपूर गटशिक्षणाधिकारी संजय वसावे, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनावणे, राजिपचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच पोलादपूरच्या नगरसेविका अस्मिता पवार, शिल्पा दरेकर व स्नेहल मेहता आदी उपस्थित होते. प्रारंभी ना. भरत गोगावले यांचा उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते तर शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांचा ना. भरत गोगावले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे 2025 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शाळा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी दिवसभर शौर्यदिनाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले.