नेरळ आरोग्य केंद्रात ‌‘रेबीज’ची वानवा

नागरिकांचा संताप; जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

| नेरळ | वार्ताहर |

कर्जतनंतर तालुक्यात दुसरे मोठे शहर हे नेरळ आहे. तर नेरळला शासकीय आरोग्य व्यवस्था म्हणून जिल्हा परिषद रायगडचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, गेले काही दिवस या प्राथमिक आरोग्य केंद्रात समस्यांचा थांबा पाहायला मिळत आहे. नुकतेच कुत्र्याने चावा घेतल्याने लस घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना लस नसल्याचे सांगत पुढे पाठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ येथील औषध, लसी नसल्याचा प्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.5) नेरळ येथे रात्री एका कुत्र्याने अचानक सात ते आठ जणांना चावा घेतला. भेदरलेल्या रुग्णांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तिथे रेबीजची लस नसल्याचे सांगण्यात आले. तर या रुग्णांना रात्री पुढे नेण्यात आले. नेरळ परिसरात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तर, बांधकाम सुरु असल्याने कामगारांची संख्यादेखील जास्त आहे. तर काही मध्यमवर्गीय कुटुंबांनादेखील शासकीय रुग्णालयाचा आधार आहे. अशात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर हे सगळे नागरिक विसंबून असताना औषधे व लस यांची कमतरता असल्यास रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा तो काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

एका बाजूला राज्य शासन आरोग्याप्रती सजग असताना, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे नसतील तर हा रुग्णांसोबत हलगर्जीपणा आहे. तेव्हा पुढील 10 दिवसांच्या आत आरोग्य विभातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या जीवाशी खेळणे सोडून गांभीर्याने लक्ष द्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात साप, विंचू, कुत्रा चावल्यावरची लस, इंजेक्शन व उत्तर औषधं उपलब्ध करून द्यावे अन्यथा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेप यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ता असल्याने अनेकदा काही प्रसंग घडल्यास जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असताना तिथे औषधे, लसी नसतात, हे खेदजनक आहे. अशात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी व प्रसूतीची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी ग्रामीण रुग्णालय मिळावे, अशी आमची मागणी आहेच. पण, ग्रामीण रुग्णालय होईपर्यंत किमान इथे रुग्णांना औषधे मिळावीत अन्यथा आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल.

गोरख शेप, सामाजिक कार्यकर्ते

माझी नुकतीच कर्जत तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन तिथली परिस्थिती जाणून घेत आहे. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.5 फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यावेळी तिथे काही इंजेक्शन, औषधे यांची कमतरता दिसून आली. त्यामुळे तात्काळ औषधे आणण्यासाठी आदेश दिले आहेत. आज गाडी औषधे, लसी आणण्यासाठी गेली आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत.

डॉ. नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी
Exit mobile version