। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्वखर्चाने अलिबाग-रोहा रस्ता करेन, असे स्वप्न विद्यमान लोकप्रतिनिधींनी दाखविले. अनेकवेळा नारळ फोडण्याचा शुभारंभ केला. सोशल मिडीयावर तो व्हिडीओ आजही व्हायरल होत आहे. परंतु त्यांनी नागरिकांची घोर निराशा केली आहे. अलिबाग-रोहा रस्ता खड्यात गेला आहे. विकासाच्या नावाखाली मते मिळविली. आता निवडणूका जवळ आल्यावर भूमीपूजनाचा तडाखा सुरु केला आहे. सर्वसामान्यांना स्वप्न दाखविले जात आहेत. विकासाची गंगा कुठे गेली, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. आता त्यांना माफ करायचे नाही. या निवडणूकीत चंडीकेचे रुप धारण करून त्यांना जागा दाखण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत भव्य महिला मेळावा (दि.13) सोनगाव येथील साने गुरुजी विद्या निकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे, अंजली ठाकूर, सुषमा दिवकर, विनया चौलकर, समिरा वाघमारे, अंकिता मोहिते, मधुरा मढवी आदी आदी मान्यवरांसह शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे त्यांनी सांगितले, आजचा हा मेळावा महिलांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी घेण्यात आला आहे. आपले संघटन मजबूत करण्यासाठी तसेच राज्याच्या विधानसभेत महिलांचे विचार पोहचले पाहिजेत यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. एका बाजूला लाडकी बहिण योजना राबविण्याचे काम करीत असताना, दुसर्या बाजूला महाडमधील लोकप्रतिनिधी एका महिलेबद्दल अपशब्द बोलतात. महिलांच्या प्रतिनिधीत्वावर, पात्रतेवर अविश्वास ठेवतात. महिला दुर्बल, कमकुवत आहे, असा विचार ते करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. महिलांनी दुर्बल असणे सोडून द्या. त्यांनी संघटीत राहून लढा देण्याची गरज आहे. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका समोर ठेवून बहिणींना खुश करण्यासाठी एक हजार पाचशे रुपयांची ओवाळणी देण्याचे काम केले जात आहे. हा पैसा त्यांचे घर, जागा विकून दिला जात नाही, तर आपल्याकडून कराच्या रुपातून घेतलेल्या पैशातूनच दिला जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. प्रभाकर पाटील या जिल्ह्याचे दिशादर्शक होते. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, पंडित पाटील, यांनी येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत चित्रलेखा पाटील देखील त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम करतील असा विश्वास आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या विभागात काम करीत आहेत. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून पाणी व इतर सुविधा देण्यासाठी धडपडत आहेत, असे अॅड. म्हात्रे यांनी सांगितले.