| उरण| प्रतिनिधी |
उरण तालुका सध्या बॅनरच्या विळख्यात सापडला आहे. येथील नाक्या नाक्यावर, मिळेल त्या ठिकाणी बॅनर लावून शोबाजी केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांचे विद्रुपिकारण झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, एखादे चांगले काम करण्याच्या नादात पोलिसच चूक करत असल्याचे समोर येत असून त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतो. याची प्रचिती उरणच्या चार फाट्यावरील सर्कलवर येत आहे. पोलिसांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या दिशादर्शक फलकावरच बॅनर लावून जनजागृती केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्यासाठी नगरपरिषद व ग्रामपंचायातीची परवानगी घ्यावी लागते. असे न केल्यास बॅनर आणि बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, सध्या तालुक्यात या नियमांना बगल देऊन मिळेल त्या जागेवर बॅनर लावून शोबाजी केली जात आहे. गणेशोत्सवाच्या या काळात असे बॅनर ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांचे विद्रुपीकरण झाले आहे. याउलट नगरपरिषद आणि ग्रामपंचायात या विद्रुपीकरणाकडे उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष करत आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये पोलीस यंत्रणेकडूनही नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
उरण पोलिसांनी ‘नशामुक्त उरण’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी निरनिराळे उपाय देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांच्यावातीने तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी बॅनरस्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, हे बॅनर लावून आपणच चूक करत आहोत, याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. कारण उरण चारफाटा येथील सर्कल येथे पोलिसांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने लावलेल्या दिशादर्शक फालकावरच संबंधित फलक लावून समाज प्रबोधन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे नव्याने येणाऱ्या नागरिकांना दिशेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणाऱ्या ठिकाणी बॅनर ठोकणाऱ्या त्या ठरविक लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्यावातीने करण्यात येत आहे.
उरण तालुका बॅनरच्या विळख्यात
