श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलीस कोठडी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर काम करणाऱ्या श्रद्धा बोऱ्हाडे यांना 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एका ठेकेदाराने मुरुड शहराजवळ असणाऱ्या एकदरा, राजपुरी, खोकरी येथील गावातील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनचे काम पूर्ण केले होते. हे काम पूर्ण झाल्यावर झालेल्या कामाचे पूर्ण बिल अंदाजपत्रकासह तयार करून देण्याकरिता कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांनी तक्रारदार यांच्याकडून सर्व प्रथम 3 लाख मागितले होते. तद्नंतर तडजोड होऊन 2 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले. याबाबत तक्रारदार यांनी अलिबाग येथील लाचलुचपत अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना श्रद्धा बोऱ्हाडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी अलिबाग-रायगड लाचलुचपत विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version