‘जेएसएस’च्या माध्यमातून श्रमदान स्वच्छता

| रसायनी | वार्ताहर |

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा उत्साहाचे औचित्य साधून व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता आवाहनाला प्रतिसाद म्हणून जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून शनिवार, दि. 20 जानेवारी रोजी प्रशिक्षणार्थी महिला भगिनी व कर्मचार्‍यांनी एकदंत मंदिर सहाण परिसरात स्वच्छता श्रमदान केले. दरम्यान, या सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता आवाहनाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, मंदिरे, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी कमालीची स्वच्छता दिसून येत आहे, असे मत डॉ. विजय कोकणे यांनी उपक्रमाप्रसंगी व्यक्त केले. तसेच सर्वांना नियमित परिसर, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता करण्याचे आवाहनदेखील केले.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैय्या, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंर्तर्गत कार्य करीत असताना हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे, जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतिक्षा चव्हाण, वेदांती पाटील, अस्मिता भोईर, रिद्धी पाटील, प्रांजल पाटील, दिपंकर राउळ, अजय पाटील, नवनाथ पोईलकर, भारती पोईलकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version