राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रवण अव्वल

| नेरळ | प्रतिनिधी |

विद्या मंदिर मंडळ मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस‌’ यांच्या स्मृती दिनानामित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेचे हे नववे वर्षे असून या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 17 महाविद्यालयांचा सहभाग होता. रायगड, पालघर, पुणे मुंबई, ठाणे अशा विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेसाठी समाजातील दैनदिन घडामोडी यांच्याबाबतचे अनेक विषय ठेवण्यात आले होते. त्यात शेतकरी कर्जमुक्त कधी होणार? सध्याच्या राजकारण लोकशाहीचा उत्सव की ढोंग, समाजमाध्यम अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यासपीठ आणि अफवांचा बाजार, भारतीय कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी आणि आरक्षण जातीनिहाय की आर्थिक निकषांवर असे पाच विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथम क्रमांक पुणे येथील एस पी महाविद्यालयाचा श्रवण वामन कदम याने पटकावला. तर द्वितीय क्रमांक मुंबई विद्यापीठमधील अभय कृष्णकुमार आळशी याने मिळविले. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची दक्षता संतोष डुकरे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर कौस्तुभ शैलेश गोसावी आणि रेवती चंद्रकांत मुंढे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

Exit mobile version