इतिहासकाळाचे साक्षीदार श्री मल्लेश्वर मंदिर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौलचे प्राचिनत्व इ. स. पुर्व 1200 पर्यंत नेता येते. प्राचीन इतिहास असलेल्या या नगरीत पुरातनकाळात चौल चंपावती नगरी या नावाने संबोधले जात होते. प्राचीन काळात चौल व रेवदंडा या दोन्ही वैभवशाली शहरांना अन्यसाधारण महत्व असून, येथून समुद्रमार्गे देशीविदेशी व्यापार होत असे, दोन्ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र व प्रसिद्ध बंदरे होती.

शिवकाळात रेवदंडा पोर्तुगिजाचे वर्चस्वाखाली होते, येथे पोर्तुगिजानी आगरकोट किल्ला बांधला. पोर्तुगिजाच्या अंमलाखाली असलेल्या रेवदंडा विभागाला लोअर चौल तसेच चौलमध्ये सन 1683 मध्ये संभाजी महाराजानी राजकोट किल्ला बांधला असा लिखीत उल्लेख सापडतो. मात्र, राजकोट किल्ला व चौलवर नेहमीच मुघलाचे वर्चस्व राहून या भागाला नेहमी अप्पर चौल संबोधले जात. प्राचीन चौल चंपावतीनगरीचे शिवकाळात अप्पर चौल व लोअर चौल असे दोन भाग पडले गेले.
चौल चंपावती देवी मंदिरानजीकच इतिहासकाळाचे साक्षीदार असलेले चौलचे भाविकांचे श्रद्धा व भक्तीचे स्थान प्रसिद्ध जागृत श्री मल्लेश्वर मंदिर आजही पहाण्यास मिळते.

चौलचौकी ते रेवदंडा बायपास या रस्त्याला मोडकआळी नजीक श्री मल्लेश्वर मंदिर आहे, इतिहासकाळाचे साक्षीदार असलेले हे श्री शंकराचे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून पुर्वीपासून प्रसिद्धीस आहे. नारळ पोफळीच्या गर्द छायेत हे श्री शंकराचे मंदिर मुख्यःरस्त्यालगत असल्याने नजरेत भरते, जुन्याकाळातील चौपाखी कौलारू व साधे बांधकामाचे श्री मल्लेश्वराचे मंदिर दुरूनच विलोभनिय वाटते, या मंदिराकडे पहाताच शांत, समाधानाची एक आगळीकता दृष्टीक्षेपात मिळते. हे मंदिर प्राचीन आहे, मात्र शिवकाळात अंतिम पर्वात सन 1758 च्या फेब्रुवारी महिन्यात या मंदिराचे बांधकाम अलिबागचे त्रिंबक महादेव डबीर यांनी केले असा उल्लेख आढळतो. या परिसरात श्री त्रिविक्रम नारायण मंदिराजवळ, आंबपुरी पाखाडीत मामलेदार बालाजी व दादाजी देशपांडे यांची हवेली असल्याचे लिखित आढळते. तर इ. स. 1970 मध्ये श्री मल्लेश्वर मंदिराजवळ चुन्याची भट्टी सुरू झाल्याचा उल्लेख आहे.

Exit mobile version