श्री सिद्धेश्‍वर मंडळ कुमार गट कबड्डी स्पर्धा

श्रीराम विश्‍वस्त, विजय क्लब, अमर मंडळ, सिद्धीप्रभा उपांत्यपूर्व फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |

श्रीराम विश्‍वस्त, विजय क्लब, अमर मंडळ, सिद्धीप्रभा यांनी श्री सिद्धेश्‍वर सेवा मंडळाने उमेश गावडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

प्रभादेवी, राजाराम साळवी उद्यानातील स्व. सचिन अनंत शेलार क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीराम विश्‍वस्त संघाने विकासचा 39-14 असा सहज पाडाव केला. पहिल्या डावात लोण देत 22-12 अशी आघाडी घेणार्‍या श्रीरामने दुसर्‍या डावात आणखी 2 लोण देत विकासच्या गोटातील हवाच काढून घेतली. पहिल्या डावात थोडाफार प्रतिकार करणार्‍या विकासचा प्रतिकार दुसर्‍या डावात अगदीच दुबळा ठरला. आशिष यादव, अंकुश पाटणे, देव शर्मा, अमित सिंग यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. विकासाचा विराज सिंग बरा खेळला.

विजय क्लबने चुरशीच्या लढतीत अमर संदेशला 43-30 असे नमवित आगेकूच केली. विश्रांतीला दोन्ही संघ 19-19 असे बरोबरीत होते. मध्यांतरानंतर विजय क्लबने टॉप गिअर टाकत आपल्या खेळाची गती वाढवीत सामना आपल्या बाजूने झुकविला. रोहन तिवारी, आयुष साळवी यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमर संदेशच्या करण रावत, यश चव्हाण यांचा खेळ नंतर मात्र ढेपाळला. आणखी एका अटीतटीच्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने हिंद केसरीला 41-38 असे पराभूत केले. पूर्वार्धात 23-20 अशी आघाडी घेणार्‍या अमरला उत्तरार्धात मात्र हिंदकेसरीने चांगलेच झुंजविले. त्यामुळेच पूर्वार्धातील आघाडीच्या जोरावर अमरने विजयाला गवसणी घातली. संकेत चव्हाण, रमेश रायकर अमर कडून, तर साहिल तळेकर, मंथन सावंत हिंद केसरी कडून उत्कृष्ट खेळले. सिद्धीप्रभाने पहिल्या सत्रातील 20-22 अशा पिछाडीवरून यंग प्रभादेवीचा कडवा प्रतिकार 42-32 असा मोडून काढला. सिद्धेश भोसले रविकांत चौरसिया यांच्या धारदार चढाया त्याला करण खेडेकरची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. यंग प्रभादेवीच्या अनिकेत मुंढे, देव जुईकर, यश पवार यांचा कडवा प्रतिकार उत्तरार्धात मात्र कमी पडला. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जय दत्तगुरुने दुर्गामाताला 35-11 असे पराभूत करीत आगेकूच केली.

Exit mobile version