| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघ पुढील महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेत भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी बरेच खेळाडू जोर लावत आहेत. एन जगदीशन, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, देवदत्त पडिक्कल हे खेळाडू दुलीप ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात मैदान गाजवून निवड समितीचे लक्ष वेधत आहेत. यावेळी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवून निवड समितीने त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली होती. परंतु, श्रेयसने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
इंग्लंड दौरा आणि आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात श्रेयसला स्थान देण्यात न आल्याने टीका झाली होती. संघातील संतुलन लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे तेव्हा निवड समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळेच श्रेयसला पुन्हा एकदा मैदान गाजवून विंडीज मालिकेतून पुनरागमन करण्याची संधी होती. त्याची भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ या मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्तीही केली गेली होती. परंतु, पहिल्या चार दिवसीय सामन्यात अपयशी ठरलेल्या श्रेयसने दुसऱ्या सामन्यातून माघार घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मंगळवारपासून दुसरी चार दिवसीय लढत सुरू झाली असून श्रेयसच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करत आहे. तो लखनौवरून मुंबईला परतला. त्याने दुसऱ्या सामन्यातील अनुपलब्धतेबाबत बीसीसीआयला कळवल्याचे समोर येत आहे.
श्रेयसची स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड
