श्रेयस-शुबमनची खणखणीत शतक

भारताने उभारला 50 षटकात 399 धावांचा डोंगर


| इंदोर | वृत्तसंस्था |


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदोर येथे खळवण्यात आला. भारताने 50 षटकात पाच बाद 399 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी शतके ठोकली, तर के एल राहुल, सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली. गीलने 97 चेंडूत 104 धावा, श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी इंदोरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने 37 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा 13 धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये 24 चेंडूत 44 धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन ॲबॉट आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरोधात इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकले. विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरनेे वादळी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. दुखापतीमुळे अय्यर सहा महन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. आशिया चषकात त्याने कमबॅक केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यातच दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अय्यरला अखेरच्या तीन सामन्यात बाहेर बसावे लागले होते. पण आता ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी केली. इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने 86 चेंडूत शतक ठोकले. श्रेयस अय्यरचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. या शतकासह श्रेयस अय्यरने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपला फॉर्म परत आल्याचे दाखवले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर तंबूत परतला. श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यापूर्वी मोहाली वनडेत श्रेयस अय्यर लवकर बाद झाला होता. मात्र या सामन्यात शानदार पुनरागमन करत शतक ठोकले. शुबमन गिलने 35 व्या वनडे सामन्यात सहावे शतक ठोकले. त्याने 35 डावात आतापर्यंत 1900 धावा चोपल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्याच्या 35 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे. या शतकासह गिलने यावर्षी वनडेत 1200 धावांचा आकडाही गाठला आहे.

ऋतुराज गायकवाड झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शुबमन गिल आणि अय्यर दोघांनीही शतके ठोकली. अय्यर आणि गिल यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली. 164 चेंडूमध्ये या दोघांनी द्विशतकी भागिदारी केली.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 16 धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. भारताचा डाव गडगडणार की काय असेच वाटत होते. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली.

Exit mobile version