बाप्पाच्या आगमनाची चाहूल
| कोर्लई | प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आला असून, सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गणेश मूर्तीकारांची मूर्ती तयार करण्यात करण्यात लगबग दिसून येत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात आजच्या वाढत्या महागाईतही व्यावसायिक तग धरून आहेत. मुरुड तालुक्यातील मजगाव येथील मूर्तीकार सुनील आयरकर यांच्या श्रीकृपा कला केंद्राला आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता त्यांनी मांडलेली आपली व्यथा.
शालेय जीवनापासूनच कलेची आवड होती. शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या वेळेत मी आवडीने गोविंद गोसावी आणि विलास पालवणकर व बिर्जे यांच्या चित्र शाळेमध्ये जमेल तसे काम करीत असताना स्वतः कधी कलाकार झालो हे मला समजले नाही. गेली 33 वर्षे श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करीत आहोत.
माझ्या जीवनामध्ये 1982 पासून मुरुडचे चलतचित्रकार बबन सुर्वे (फुटाणकर) यांच्या सहकार्याने व जागेत स्वतःचा गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरु केला. सन 1992 पासून आतापर्यंत 33 वर्षे गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. सुरुवातीला पूर्वी 100 टक्के शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करीत असे. परिस्थितीनुसार आणि आवडीनुसार त्यावेळस अल्प मोबदल्यात कामगार मिळत असत. काळानुसार परिस्थितीत झालेला बदल, वाढत्या महागाईमुळे, नवीन पिढीतील युवा वर्ग मूर्तीकामासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे गेली पंधरा वर्षे पेण-हमरापूर येथून आम्हाला पीओपीच्या कच्च्या मूर्ती आणाव्या लागत आहेत. दिवसरात्र मेहनत घेऊन याच व्यवसायाचा आधार घेत मुलगा शुभम वकील झाला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार पीओपी मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्याने व मुंबई उच्च न्यायालयाने यावरील बंदी उठवल्याने आम्हाला ग्राहकांना शंभर टक्के मूर्ती देता आल्या. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, रंग, कच्च्या मालाच्या किमतीत 25 टक्के वाढ झाली असून, कामगारांच्या पगारात वाढ झाली असल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत थोडीफार वाढ करण्यात आली असल्याची माहिती मूर्तीकार आयकर यांनी दिली.






