| कोर्लई | राजीव नेवासेकर |
मुरुड शहरातील श्री काळभैरव देवस्थान ट्रस्ट कित्ते भंडारी समाजाच्या वतीने श्री कालभैरव मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनाचा व दही-पोह्याचा प्रसादाचा लाभ घेतला. सुमारे दोनशे वर्षे ही परंपरा भंडारी समाजाच्या वतीने जपण्यात येत असल्याची माहिती समाज अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा श्रीकृष्ण जन्मोत्सव भंडारी समाजाच्या वतीने मुरुड शहरातील श्री काळभैरव मंदिरात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने अष्टमीच्या सात दिवस आधी अखंड टाळ, मृदंग नाद केला जातो. दररोज समाज बांधव रात्री भजनाचा कार्यक्रम करतात. नारळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी भव्य अश्वारूढ श्री कालभैरवाच्या मृर्तीची स्थापना केली आहे.
अष्टमीच्या रात्री 12:39 वाजता जन्मकाल झाल्यानंतर रात्री दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मुर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीत म्हटले जाते. दुसर्या दिवशी गोविंद पथक दारोदारी घरोघरी नाक्या नाक्यावर जाऊन दहीहंडी फोडतात, त्यानंतर सायंकाळी या उत्सवाचा समारोप केला जातो. रात्री श्री काळभैरव मंदिरात स्थापन केलेल्या अश्वारूढ श्री कालभैरवाच्या मृर्तीचा विसर्जन करण्यात येते. या कार्यक्रमाला श्री काळभैरव देवस्थान ट्रस्ट भंडारी समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करत आले आहेत. या मंदिरात शहरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात व दही पोह्यांचा महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे समाज अध्यक्षांनी सांगितले आहे.