चौलमधील श्री मुखरी गणपती

| रेवदंडा | महेंद्र खैरे |

चौलमधील श्री मुखरी गणपतीस अन्ययसाधरण महत्व आहे. हे मंदिर अलिबाग पासून 14 कि.मी. अंतरावर रेवदंडा हमरस्त्यावर आहे. श्री मुखरी (मुख्य ) स्वयंभू गणपतीचे मंदिर हे तिनशे वर्षापुर्वीचे असावे असे सांगितले जाते. या मंदिरातील श्री गणेशाची मुर्ती श्री राऊत घराण्याच्या जागेत सापडली, मग तेथेच तिची स्थापना केली. तेव्हापासून तिचे पुजारीपण आजतागायत त्याच्याकडे आहे.

श्री मुख्य (मुखरी) या स्वयंभू गणेशाच्या जुन्या मंदिराची रचना देखील मोठी सुंदर आकर्षक होती. स्वयंभू श्री गणेशाची अडीचफुट उंचीची देखणी मुर्ती, छोटासाच गाभारा, समोर प्रशस्त दालन, नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेल्या सुंदर रमणीय परिसर, मंदिरासमोरील तुळशी वृंदावन, दिपमाळा, विस्तीर्ण पोखरण या सर्वामुळे मंदिराची शोभा अतिशय विलोभनीय झाली आहे. हे देऊळ चौलच्या उत्तरेकडील पाच पाखाडयातील ग्रामस्थांच्या ताब्यात आहे. माघ शुध्द चतुर्थीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. जुन्या मंदिरात या उत्सवाची सुरूवात 1967 साली गंगाबाई चिंतामण पाटील यांनी केली.

त्यांना सर्व लहानथोर दादी नावाने हाक मारत असत. दादींचा जन्म मुरूड तालुक्यातील नांदगाव गावी झाला. फार पुर्वीपासून नांदगाव येथे श्री गणेश मंदिरात माघी उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. लहानपणापासून हा उत्सव पाहिल्यामुळे श्री गणेशावर असीम भक्ती असणार्‍या दादींच्या मनात घरासमोरील श्री गणेश मंदिरातही असाच माघी गणेश जन्माचा उत्सव साजरा करावा, अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती गणेश जन्माकरीता लागणारी मुर्ती सहस्त्र दुर्वासह पुजा, गणेश जन्माची आख्यायिका सांगण्याकरीता किर्तनाची व्यवस्था, जमणार्‍या भाविकांना जन्मोत्सवानंतर प्रसाद, किर्तन, ऐकू जाण्याकरता लाऊउस्पिकरची व्यवस्था व श्री गणेशाची मुर्ती त्यांच्या घरातून देवळात आणण्याच्या वेळी ताशे वाजंत्री वरील सर्व कार्यक्रमांचा खर्च दादींनी स्वतःचे शिरावर घेऊन ही कल्पना पाच पाडयांतील ग्रामस्थांच्या कानावर घातली. ग्रामस्थांनी या श्री मुखरी गणेशाच्या जन्मोत्सवाची परवानगी दिली. तेव्हापासून श्री मुखरी गणपती चौल मंदिरात माघी उत्सव मोठया आनंदाने साजरा करण्यात येतो.

Exit mobile version