| वावे | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वावे येथे गुरुवारी (दि.26) 77 व्या श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.00 वाजता सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. त्यांनतर श्रीरामप्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी 10.00 वाजता होणार आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता श्रीरामप्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच, दुपारी 1.00 वाजता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तजनांच्या मनोजनार्थ बेलोशी, महाजने, आंदोशी, उसर, वळवली, आंबेपूर या सहा भजनी मंडळांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री 9.00 वाजता श्रीरामरथ चलचित्र पालखी सोहळा पार पडणार आहे. यावेळी वेषभुषाधारक भाविक ग्रामस्थ हे श्रीरामप्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. श्रीरामप्रभूंच्या पालखीसोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात. तसेच, जय हनुमान लाठीकाठी आखाडा भोनंग यांचे, लाठी-काठी व मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके मंदिराच्या प्रांगणात दाखविण्यात येणार आहेत. या सोहळ्याचा आनंद आपण सर्वांपर द्विगुणीत करावा, असे आवाहन वावे ग्रामस्थांच्यावतीने दिनेश तुरे यांनी केले आहे. तसेच, नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शनिवारी (दि.28) रात्री 10.00 वाजता ‘दिल्या घरी सुखी रहा’ या दोन अंकी सामाजिक व कौटुंबिक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.







