माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन
| अलिबाग | वार्ताहर |
अवधूत सांप्रदायाचे प्रणेते श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांनी अध्यात्मिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करून समाजप्रबोधन करून समाजाला एक दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. रविवार, 21 जानेवारी रोजी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानने रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील भाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमुख ठाकूर, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, मोहन मनचुके, शंकरराव म्हात्रे, गुरूबंधू-भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंडित पाटील पुढे म्हणाले की, या प्रतिष्ठांचे कार्य उल्लेखनीय असे आहे. मागील 26 वर्षे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने रक्तदान शिबीर भरवणारे हे एकमेव असे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानसोबत माझा तसेच स्वर्गीय प्रभाकर पाटील यांचा जिव्हाळा आहे. या प्रतिष्ठानने पहिला पुरस्कार मला दिला, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि यातूनच मी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचलो, असे देखील ते म्हणाले.
वाढत्या जीवनमानामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मधुमेह, रक्तदाब याचीदेखील आपण वेळेवर तपासणी करावी, असा उपस्थितांना त्यांनी सल्ला दिला. आपण विविध सामाजिक कार्य करता त्यासोबतच आपल्या प्रतिष्ठानने स्वच्छतेचादेखील एक उपक्रम आयोजित करावा, अशी सूचना पंडित पाटील यांनी प्रतिष्ठानला केली. या रायगड जिल्ह्याचा विकास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून स्वर्गीय प्रभाकर पाटील, स्वर्गीय दत्ता पाटील व आमदार जयंत पाटील यांनी जास्तीत जास्त घडवून आणला, असेही ते म्हणाले. शेवटी पंडित पाटील यांनी प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याबद्दल भरभरून कौतुक केले व प्रतिष्ठानला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर व सर्व सेवक वर्ग तसेच प्रतिष्ठानचे सर्व सदस्य महिला यांनी परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये एकूण 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात पेझारीसह वाघोडे, शहाबाज, गोहे, खोपटे, अलिबाग येथील मंडळींनी सहभाग घेतला होता.
बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याच्या काळजीसोबत आपण स्वच्छतादेखील बाळगली पाहिजे. सर्वांनीच स्वच्छ राहिलं पाहिजे त्यासाठी आपण विविध स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरे राबवावीत. आपल्याला आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पंडित पाटील