। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन वगळता राज्याचे सर्व भागातील महिला क्रिकेट खेळाडूंना संधी देण्यासाठी महिला प्रीमियर लीग स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यात कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील क्रिकेट खेळाडू सृष्टी भोईर हिची रत्नागिरी जेट्स संघामध्ये समावेश झाला आहे.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पहिल्या पर्वासाठी सृष्टी भोईर हीची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आलेल्या संघात रत्नागिरी जेट्सने सृष्टी हीची निवड केली आहे. या संघाची कर्णधार हि भारताची यशस्वी सलामीवीर स्मृती मंधना असून, सृष्टीला तिचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधून प्रथमच निवड होण्याचा मान सृष्टीला मिळाला आहे. सृष्टीने आपल्या स्वतःच्या कामगिरीने महारष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये स्वतःची प्रतिमा उंचावली आहे. तिच्या या यशाने स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जेट्स संघात निवड झाल्याने तिला आता आणखी चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.