| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन आगाराकडून अनेक वर्षे नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होत असणाऱ्या श्रीवर्धन-अलिबाग एसटी बसला आर्थिक उत्पन्नात घट होत होती. या कारणास्तव आगाराकडून ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्रीवर्धन येथील समाजसेविका प्रवीता माने यांनी आगार प्रमुखांकडे या बस बाबतीत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, श्रीवर्धन-अलिबाग बस सेवा 1 जुलैपासून पुर्ववत होणार असल्याचे श्रीवर्धन आगाराकडून सांगण्यात आले आहे.
1987 साली श्रीवर्धन आगाराची स्थापना झाल्यापासून श्रीवर्धन-अलिबाग बस सेवा सुरु आहे. पहाटे पावणेसहा वाजता श्रीवर्धन येथून मार्गस्थ होणारी बस म्हसळा, माणगाव, वडखळ मार्गे अलिबाग येथे पोहोचत असे व सायंकाळी सहा वाजता श्रीवर्धनकडे परतीला फिरत असे. परंतु, कोव्हीड काळानंतर श्रीवर्धन-अलिबाग बसला पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत ही बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, 14 एप्रिल रोजी श्रीवर्धन आगाराकरीता बीएस 06 या अत्याधुनिक पाच बसेसचा लोकार्पण सोहळा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना प्रवासी वर्गाने अलिबाग बस बाबतीत विचारणा केली असता तोट्यातील बस पुन्हा सुरू होणार नाही, असे उत्तर दिले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी प्रवासी वर्गाची काहीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी पसरली होती. समाजसेविका प्रवीता माने यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, श्रीवर्धन आगाराकडून श्रीवर्धन-अलिबाग बस सेवा 1 जुलै पासून पुर्ववत होत आहे.







