जीओच्या खड्यात श्रीवर्धन-नालासोपारा बस

ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहनचालक व प्रवाशांना त्रास
। बोर्लीपंचतन । मकरंद जाधव ।
श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावाजवळ आज सकाळी श्रीवर्धनहुन नालासोऱ्याकडे जाणारी बस रस्त्याच्या साईडपट्टीमधील खड्यात अडकली. वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवत बस सावरल्याने बस पलटी होता होता वाचली. सुदैवाने गंभीर अपघात टळला असुन काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अचानक झालेल्या या प्रकाराने बसमधील प्रवासी घाबरुन गेले. श्रीवर्धन दिघी मार्गावर रिलायन्सच्या जीओ मोबाईल नेटवर्क कंपनीकडून केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला ठेकेदाराने खोदकाम केले परंतु खोदकाम केलेल्या खड्यामध्ये पावसाळ्यात वाहने अडकुन अपघात होउ शकतो याची काळजी न घेताच माती टाकुन ते खड्डे बुजवल्याने पावसाळा चालु झाल्यापासुन या रस्त्यावर अनेक वाहने चिखलात खचली आहेत.

सदर काम करताना ठेकादाराने बांधकाम विभागाकडुन केबलच्या खोदकामासाठी लेखी परवानगी घेतली आहे का ? आणि घेतली असेल तर खोदकाम करताना संबंधीत कंपनीकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत, कशाही प्रकारे रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले जात आहे, याकडे बांधकाम विभागाने लक्ष न दिल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास होत आहे.

जीओ कंपनीचा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणा विरोधात या परिसरातील जनतेतून संताप व्यक्त होत असुन बांधकाम विभाग एखादा मोठा अपघात होउन जीवितहानी झाल्यावर याकडे लक्ष देणार आहे का ? असाही सवाल उपस्थित केला जात असुन जीओ कंपनीच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version