| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सततचा अनियमित पाऊस आणि भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने अखेर श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित केला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही महिन्यांत तालुक्यात अपेक्षित पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक पाझर तलावांनी तळ गाठल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही पिण्याच्या पाण्याचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा अधिकृत आदेश जारी केला आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे आता शासकीय पातळीवर तातडीने मदतकार्य राबवले जाणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, शेतकरी कर्जाचे पुनर्गठन आणि वसुलीस स्थगिती देणे, जमीन महसुलात सूट देणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत देणे, रोहयो अंतर्गत नवीन रोजगार कामे सुरू करणे यांसारख्या उपाययोजना तात्काळ प्रभावाने लागू केल्या जातील. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर प्रत्यक्ष टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून टंचाई निवारणासाठी तातडीने पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.
श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ घोषित
