श्रीवर्धनला अवकाळी पावसाने झोडपले

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
काल बुधवारी सकाळपासूनच प्रथम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली होती. मात्र सकाळी अकरानंतर जोरदार वारे व मुसळधार पावसाने श्रीवर्धन तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. पाऊस पडत असताना जोरदार वारे वाहत असल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाली. वारे थंडगार असल्यामुळे वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. समुद्र देखील सकाळपासून खवळलेला पाहायला मिळत होता.
बुधवारी संपूर्ण रात्रभर पाऊस कोसळतच होता. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टी सह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर त्रेधातिरपीट उडाली. अनेकांनी भाताच्या व पेंढ्याच्या उडव्यांवर प्लास्टिक घालण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र मागील महिनाभरापासून उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे सुखद गारवा अनुभवायला मिळाला.

Exit mobile version