‘मन करा रे प्रसन्न’ कार्यक्रमाने श्रीवर्धनकर मंत्रमुग्ध

| श्रीवर्धन | वार्ताहर |

‘मन करा रे प्रसन्न’ या डॉ. संजय उपाध्ये यांच्या एकपात्री, धमाल विनोदी पण नॉन अध्यात्मिक कार्यक्रमाने श्रीवर्धनचे शेकडो श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले. निमित्त होते कोकण मराठी साहित्य परिषद, श्रीवर्धन शाखेच्या विसाव्या वर्धापन दिन समारंभाचे. श्रीवर्धन येथील श्री दत्त मंदिर सभागृहामध्ये सुप्रसिद्ध वक्ते डॉ.संजय उपाध्ये यांचा ‘मन करा रे प्रसन्न’ हा धमाल कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉ. उपाध्ये हे मूळचे श्रीवर्धनचेच रहिवासी असून त्यांनी आजपर्यंत त्यांच्या ‘गप्पाष्टक’ या धमाल विनोदी व बौद्धिक कार्यक्रमाचे तब्बल 1535 प्रयोग सादर केले होते. हे प्रयोग भारताव्यतिरिक्त दुबई, अबुधाबी, कॅनडा, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका, जपान इ.16 देशांतही सादर झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास को.म.सा.प. रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ, समन्वयक अ.वि.जंगम हे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते. सुधीर शेठ यांनी आपल्या मनोगतांत श्रीवर्धन शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तद्नंतर उपाध्यक्ष प्रसाद जोशी यांनी प्रास्ताविक केले. ‘मन करा रे प्रसन्न’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून संपेपर्यंत दीड ते दोन तास श्रीवर्धनच्या रसिक प्रेक्षकांनी डॉ.संजय उपाध्ये यांच्या वाक्यावाक्याला आणि मिश्कील व मर्म विनोदी प्रवचनाला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमात डॉ. उपाध्ये यांनी मनुष्य स्वभावाचे विविध नमुने, सवयी, जीवनाचा अर्थ आदी गहन विषय अत्यंत लीलया आणि बौद्धिक विनोदांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले.

Exit mobile version