। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात ‘क’ वर्गात मोडणारी श्रीवर्धन नगरपरिषदेची या वर्षी कराची वसुलीची टक्केवारी घसरली असून नागरिक एकंदरीत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास अनुत्सुक दिसत आहेत. श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत 5 हजार 125 मालमत्ता धारक आहेत. तर, नळ जोडणी ग्राहकांची संख्या 2 हजार 409 इतकी आहे.अद्याप पर्यंत चालू आर्थिक वर्षात मालमत्ता धारकांकडून 67.19 टक्के वसुली आणि पाणीपट्टीची 65.12 टक्के इतकीच वसुली झाली आहे.
पर्यटन क्षेत्रात ‘ब’ दर्जा प्राप्त झालेल्या श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना देण्यात येणार्या मालमत्ता कर व पाणीपट्टी या करांच्या माध्यमातून शहरातील विकासकामे,पाणी,पथदिवे,स्वच्छता केली जाते. नगरपरिषद तर्फे ध्वनिक्षेपक, बॅनर या द्वारे कर भरण्याचे तसेच कर न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल या बाबतीत जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी वसुली करीता नगरपरिषदेने सात पथकं नेमली आहेत. घरोघरी पथके जाऊन ही नगरपरिषदेची तिजोरी अर्धी रिकामी आहे. श्रीवर्धन येथे 5 हजार 125 मालमत्ता धारक आहेत.त्यांच्याकडून 1 कोटी 32 लाख 73 हजार रुपये इतकी करवसुली होणे अपेक्षित आहे. 20 मार्च पर्यंत 89 लाख 19 हजार रूपये इतकी वसुली झाली आहे.नळ जोडणी ग्राहकांची संख्या 2 हजार 409 असून अपेक्षित कर रुपये 42 लाख 57 हजार आहे. परंतु, प्रत्यक्षात वसुली मात्र 27 लाख 72 हजार रुपये इतकीच झाली आहे.