श्रीवर्धनकरांचा महावितरणविरोधात संताप

सांगा, आम्ही व्यवसाय तरी कसे करू?
सततच्या बत्तीगुलमुळे व्यावसायिकांचा संतप्त सवाल

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडताच विजेचा लंपडाव सुरू होतो. फक्त पावसाची सुरूवात झाली रे झाली की येथील वीज गायब होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. काही वेळेला वादळ-वार्‍यात दक्षता म्हणून वीज बंद केली जाते. महावितरणच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधारात बसावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सतत होणार्‍या खंडित विजेमुळे व्यवसायावर परिणाम होत असून, आम्ही व्यवसाय तरी कसा करायचा, असा संतप्त सवाल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

रोज दिवसा दर अर्ध्या तासाला विजेचा लपंडाव सुरू असून, आता तर रात्रीसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे गावाचा सार्वत्रिक पाणीपुरवठाही विजेअभावी काही दिवस खंडित होता. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उद्भवला आहे. नागरिक हैराण झाले आहेत. विद्युत उपकरणांवरील व्यवसाय ठप्प झाले असून, उद्योगधंदे व व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. यंदाही पावसाळ्यात असाच नागरिकांचा अनुभव येत आहे. त्यादृष्टीने महावितरणकडून काहीच कृतीतून दिसून येत नाही. तालुक्यात ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे फक्त कागदावरच केली का, असा प्रश्‍न आता नागरिक विचारू लागलेत.

कमी-जास्त विजेचा झटका

तालुक्यात सध्या पाऊस कमी असला तरी या वादळी पावसाचे कारण सांगून बोर्लीपंचतन परिसरातील कमी-उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अनेक घरांतील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत बिघाड होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

तीन दिवस स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. किमान या दिवसांत तरी 24 तास वीजपुरवठा असावा.

धवल तवसालकर, वेळास
Exit mobile version