| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन येथे विकासकामांना वेग आला असला, तरी शहरातील अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या झाली आहे. जीवना बंदर येथील मत्स्य बंदराचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले असून, मुळगाव कोळीवाडा येथे बंधारा व जेट्टीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांमुळे भविष्यात पर्यटन वाढण्याची शक्यता असताना शहरातील रस्त्यांची अपुरी रुंदी मात्र मोठा अडथळा ठरणार आहे.
शहरातील तसेच बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते अवघे 10 ते 12 फूट रुंदीचे आहेत. त्याच रस्त्यांवर पर्यटकांची वाहने, स्थानिकांची वाहने, मालवाहतूक वाहने तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या वेळेत वाहनचालकांसह पादचाऱ्यांना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, त्यात सुमारे 70 टक्के घरे बाधित होत असल्याने स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे रुंदीकरण रखडले असून, पर्यायी ‘बायपास’ रस्त्याचा प्रस्तावही अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, बाजारपेठेतील कोंडी कमी करण्यासाठी अनधिकृत फेरीवाले व टपरीधारकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, ही कारवाई तात्पुरती मलमपट्टी ठरत असून, अरुंद रस्त्यांच्या मूळ प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय आवश्यक आहे. श्रीवर्धनमध्ये कोट्यवधींची विकासकामे होत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाने बायपासचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.अन्यथा वाढत्या पर्यटनाचा सर्वाधिक फटका शहराच्या वाहतूक व्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
येत्या काही कालावधीमध्ये श्रीवर्धन शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्याकरिता पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार असून, वाहतुकीची समस्या समूळ नष्ट करण्यात येईल. भविष्यात रस्ता रुंदीकरण जरी झाले तरी स्थानिकांना विचारत घेऊनच रस्ता रुंदीकरण करण्यात येईल. कोणावरही अन्याय न होता वाहतुकीच्या समस्येच निराकरण करण्यात येईल.
ॲड. अतुल चौगुले,
नगराध्यक्ष, श्रीवर्धन
