तीन वर्षात 40 हजार सुपारी रोपांची विक्री
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
सुपारी बागायतदारांचे निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात मोठे नुकसान झाले. दोन्ही वादळात तालुक्यातील 70 टक्के पोफळींचे नुकसान झाले, तर उर्वरित पोफळींवर रोगराई, किडींचा प्रादुर्भाव झाल्याने श्रीवर्धन रोठा सुपारीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. दोन-वर्षांत बागायतदारांनी जोमाने सुपारीची लागवड केली असून लवकरच उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळापूर्वी श्रीवर्धनमध्ये 365.25 हेक्टर क्षेत्रात रोठा सुपारीची लागवड होती. सुपारीला समुद्रकिनार्यावरील गाळाची, पाण्याचा निचरा होणारी, तसेच बारमाही ओलावा असणारी जमीन मानवते. 20 ते 35 सेल्सिअस तापमान योग्य आहे. रोठा सुपारीत पांढर्या गराचे प्रमाण जास्त असून खाण्यास मऊ व फळाचा आकार आकर्षक असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो. रोठ्याचे वार्षिक उत्पादन 626.17 मेट्रिक टन इतके होते. एका हेक्टर क्षेत्रात 2.25 मेट्रिक टन उत्पादकता असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याआधी तालुक्यातील बागायतदारांचे 2015 ते 2020 या पाच वर्षांतील सरासरी उत्पन्न अंदाजे तीन कोटी पंचाहत्तर लाख इतके होते, मात्र निसर्ग चक्रीवादळाने सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळामुळे उंच पोफळी भुईसपाट झाल्या. अनेक पोफळींना उभ्या चिरा गेल्या. त्यात पावसाचे पाणी साठल्याने बुरशी धरली. जेमतेम 30 टक्के पोफळींनी तग धरला होता, परंतु तौक्ते चक्रीवादळात या पोफळींचे नुकसान झाले. वादळानंतर पोफळीला खवले कीड, कोळ रोग, अळंबी, बांड रोग अशा रोगराईने घेरले. निसर्गाच्या लहरीपणाने श्रीवर्धन रोठा सुपारीचे उत्पादनात मोठी घट झाली. सुपारी बागायतदारांनी पुन्हा जोमाने रोठा सुपारी लागवडी केली आहे. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व तालुक्यातील खासगी नर्सरीतून बागायतदार सुपारीची रोपे खरेदी करीत वाड्यांमध्ये रोठा लागवडीला प्राधान्य देत आहेत.
निसर्ग चक्रीवादळानंतर सात हजार, तर तौक्ते चक्रीवादळानंतर 34,735 असे एकूण 41,735 इतक्या संख्येने रोठा सुपारीच्या रोपांची विक्री श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व तालुक्यातील खासगी नर्सरींमधून झाली आहे. कोकण भागात हमखास उत्पन्न व उत्पादन देणारा बाणावली नारळाच्या लागवडीकडे मात्र बागायतदारांनी दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या परिस्थितीत रोठा सुपारीला बाजारात चांगला भाव कसा मिळतो आहे. सुपारीची प्रोसेसिंग युनिट कशी सुरू करता येईल, याबाबत राज्य सरकारने विचार करणे आवश्यक आहे. सुपारीचे आयुर्वेदिक महत्त्व लोकांना पटणे महत्त्वाचे आहे. सुपारी लागवडीकरिता बागायतदारांना सरकारने शंभर टक्के अनुदानात्मक लागवडीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी रोठा बागायतदारांनी केली आहे.