। मुंबई । वृत्तसंस्था ।
ठाण्याच्या श्रिया देशपांडेने विधी शाहला 4.2 अशा फरकाने नमवित डॉ.रमेश प्रभू स्मृती महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे जेतेपद मिळविले. मुंबई उपनगर टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे.
श्रियाची सुरवात चांगली झाली नाही. तीला पहिला गेम 8.11 असा गमवावा लागला. यानंतर श्रियाने जोरदार पुनरागमन करत पुढचे दोन गेम 15.13, 11.7 असे आपल्या नावे करत आघाडी घेतली. विधीने चौथा गेम 11.5 असा जिंकत सामना बरोबरीत आणला. यानंतर श्रियाने आपला खेळ उंचावत पुढचे दोन गेम 11.4, 11.6 असे जिंकत जेतेपद मिळविले. त्यापूर्वी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात श्रिया देशपांडेने अनन्या बासकला पराभूत केले तर विधी शाहने अनन्या चांदेला नमवित आगेकूच केली.