कुस्ती स्पर्धेत शुभम ढेबेचे यश


| चिपळूण | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेतील चिपळूण तालुक्यातील अलोरे प्रभागातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पोफळी होडेवाडी शाळेचा विद्यार्थी शुभम बाबू ढेबे हा पोफळी करजावडे या दुर्गम वाडीत राहतो. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आणि बेताची आहे. शाळेपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर राहणाऱ्या या विद्यार्थ्याने (14 वर्षाखालील 35 किलो वजनी गटात) गोल्ड मेडल मिळवत शाळेच्या इतिहासात व संपूर्ण जिल्हा परिषद शाळांच्या इतिहासात कुस्ती या क्षेत्रातील एक नवीन पान सुवर्ण अक्षराने लिहिले आणि कोल्हापुर येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. शुभमला मुख्याध्यापक व कुस्ती प्रशिक्षक आप्पासो मदने यांनी मार्गदर्शन केले. त्याला शाळेतील सर्व शिक्षकांचे बहुमोल सहकार्य मिळाले. चिपळूण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी इरणक, अलोरे प्रभागाच्या विस्तार अधिकारी सौरवी जाधव आणि शिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गर्जे यांनी शुभमचे व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. पोफळी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी शुभमचे अभिनंदन करून विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version