‘शुभ्रा प्रकल्प’ बनतोय कर्णबधीरांचा आधार

। नेरळ । वार्ताहर ।
समाजसेवी आवड असणारी मंडळी समाजसेवेचे ध्येय उराशी बाळगून आपली आवड आणि छंद जोपसण्यासाठी प्रसंगी पदरमोड करून आपली आवड जोपासताना दिसतात. अशाच एका दाम्पत्याने समाजातील कर्णबधीर मुलांसाठी आणि आदिवासी समाजासाठी काम करण्याचे स्वप्न बाळगले आणि त्यांनी कर्जत तालुक्यात जमीन खरेदी केली. कर्जत तालुक्यात सर्वाधिक कर्णबधीर तरुण हे कर्जतच्या रेल्वे पट्ट्यात वस्ती करून आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या हालिवली गावाच्या परिसरात राजेंद्र वर्तक आणि भाग्यश्री राजेंद्र वर्तक या दाम्पत्याने कर्णबधीर मुलांची सेवा करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे.

रिलायन्स कंपनीच्या रियल इस्टेटची रायगड जिल्ह्याची जबाबदारी पाहणारे राजेंद्र वर्तक आणि पेशाने शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री वर्तक यांनी कर्णबधीर यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. कर्जत येथे जमीन खरेदी करून प्रकल्प सुरू करणार्‍या राजेंद्र वर्तक त्यांच्या पश्‍चात प्रत्यक्षात आणून समाजातील पीडित वर्गाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्याचे प्रत्यक्षात सुरू केले. कर्जत तालुक्यात येऊन कर्णबधीर मुलांसाठी काम करण्याचे ध्येय उराशी बाळगून असलेल्या भाग्यश्री वर्तक यांना कर्जत तालुक्यातील आदिवासी लोकांचे प्रश्‍न समोर दिसले आणि त्यांनी मग कर्णबधीर मुलांसाठी काम करतानाच आदिवासी समाजासाठीसुद्धा समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. 30 वर्षे चेंबूर येथील शाळेत कर्णबधीर मुलांना शिकविणार्‍या शिक्षिका आणि समाजसेविका भाग्यश्री वर्तक यांना मुलांमध्ये रमण्याची आवड असल्याने त्या ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कामे करण्यासाठी जातात, त्या त्या ठिकाणी लहान मुलांचे जत्थे आवडीने गोळा होत असतात. त्यामुळे अवघ्या तीन वर्षांत कर्जत तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात ‘शुभ्रा प्रकल्प’ हे नाव अधोरेखित केले गेले आहे.

मुंबई येथे वास्त्यव्याला असलेल्या वर्तक या आता कर्जतच्या आपल्या कार्याची कर्मभूमी मानलेल्या ठिकाणी रमलेल्या दिसतात.त्यांची सामाजिक कार्याची आस्था आणि आवड यामुळे त्यांनी कर्जत तालुक्याच्या अनेक भागात आपले अनुयायी गोळा केले आहेत.त्यात हेमंत कोंडीलकर, योगिता, कल्पना पवार, निलेश शेळके, प्रियंवदा हरवंदे, प्रभाकर शेळके, दत्ता शेळके, मदन, माया, रवींद्र शिंदे, प्रमिला बोराडे, गणेश मते, नाईक काका, रोहिणी रवींद्रन, किशोर गायकवाड, भाविका जामघरे यांसारखे अनेक लोक आज त्यांच्या कार्यात सहभागी झाले आहेत.

कर्णबधीर मुलांसाठी राष्ट्रीय कार्य
शुभ्रा प्रकल्प च्या प्रमुख भाग्यश्री वर्तक यांची शैक्षणिक क्षेत्रात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका अशी ओळख निर्माण झाली आहे. दादा या शॉर्ट फिल्मच्या त्या सहायक व सहनिर्मात्या आहेत. कर्णबधिर मुलांच्या जनजागृती साठी ही फिल्म तयार केली गेली आहे.या शॉर्ट फिल्मला दादासाहेब फाळके अवॉर्डचे नॉमिनेशन मिळाले आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांमध्ये साहसाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे नेतृत्वगुण उदयास यावेत यासाठी पेठ आणि भिवगड येथे विद्यार्थ्यांना ट्रेकिंग ला नेले आहे. तसेच निवडणुकीत दिव्यांग लोकांकरिता समन्वयक म्हणून काम केले आहे. नुकतेच त्यांनी कर्णबधिरांचे देवदूत हे प्रोजेक्ट केले. आतापर्यंत भाग्यश्री वर्तक यांना 21 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

Exit mobile version