| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
पर्यटनाच्या ऐन हंगामामध्ये प्रसिद्ध काशीद आणि मुरूड बीचवर पर्यटकांची वर्दळ नसल्याने शुक्रवारपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. किमान काशीद बीचवर शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मुरूड बीचवरदेखील जंजिरा पाहणारे पर्यटक येत असतात. परंतु, सध्या फारसे पर्यटक आलेले दिसून येत नाहीत.
यामुळे पर्यटन व्यावसायिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. पर्यटक येतील असा कयास गेल्या आठवड्यात पर्यटन क्षेत्रातील काही मंडळींनी व्यक्त केला होता; मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे. काशीद येथील रहिवासी सूर्यकांत जंगम यांनी रविवारी सांगितले की, बिचवर जेमतेमच पर्यटक आले असून, करमणूक साधने म्हणजे बोटिंग वगैरे बंद असल्याने पर्यटक थांबायला तयार नाहीत. हिटदेखील वाढली आहे. शनिवारीदेखील फारसे पर्यटक नव्हते. जंजिरा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असूनही मुरूड बीचवर पर्यटकांची उपस्थिती दिसून आली नाही. खड्डेमय रस्ते, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आणि नवरात्र असल्याने पर्यटन ठप्प झाल्याचे अनुमान काहींनी व्यक्त केले आहे. दोन्ही ठिकाणी पर्यटक नसल्याने स्टॉलधारक आणि एकूणच पर्यटन व्यवसाय थंडावला आहे.
साळाव ते मुरूड या 32 किमी मार्गावर खड्डे पडल्याने मुंबईकडील पर्यटक काशीद किंवा मुरूड कडे येण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. रस्ते खड्डेमय असल्याने सर्वच जणांनी वारंवार नापसंती व्यक्त केली आहे.