रत्नागिरीतील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक

बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड

। देवरुख । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यातील ताम्हाणेसारख्या ग्रामीण भागातील सिद्धेश प्रमोद तटकरे या कबड्डीपटूने जिद्दीच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. त्याची बंगाल वॉरियर्सच्या संघात निवड झाली आहे. प्रो-कबड्डीत निवड झालेला तो तालुक्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

लाल मातीतील या मर्दानी खेळात तालुक्यातील अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. साडवली सह्याद्रीनगर गावातील प्रशांत सुर्वे यांच्यासारखे काही व्यावसायिक खेळाडू नावारूपाला आले. याच लाल मातीतून सिद्धेश तटकरे हा खेळाडू घडला आहे. त्याला शालेय जीवनापासूनच कबड्डीची आवड होती. त्याच्या वडिलांनाही कबड्डीची आवड असल्याने इथूनच त्याच्या कबड्डीच्या प्रवासाला सुरूवात झाली. माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना अभिजीत सप्रे तर दादासाहेब सरफरे बुरंबी-शिवने विद्यालयाचे शिक्षक सुहास पाब्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तो घडत गेला.याच दरम्यान तो जाखमाता ताम्हाणे, सोळजाई देवरुख संघातून खेळत होता. त्यावेळी त्याला संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबईत आल्यानंतर नोकरी सांभाळून अंकुर, युनियन बँक, न्यू इंडियन इन्श्युरन्स या संघातून तो खेळू लागला. सहा महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या संघातूनही तो खेळला. मुंबईत त्याला प्रशांत सुर्वे, अनिल घाटे, मिलिंद कोलते, सुभाष पाटील, अक्षय मेरठ, महेश साप्ते, मीनल पालांडे, जसपाल राठोड, गणेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Exit mobile version