उपाययोजना करण्याची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड-आगरदांडा रस्त्यावर डांबरीकरणात साईडपट्ट्या न भरण्यात आल्याने धोकादायक ठरत आहेत. त्यात अरुंद रस्ते असल्याने जणू अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्त्यावरील गतिरोधकांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांना निश्चित स्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांच्या विलंबानंतर मुरुड-आगरदांडा रस्ता चकाचक झाला आहे. परंतु, हा रस्ता बनविताना साईडपट्ट्या भरण्यात न आल्याने धोकादायक बनला आहे. त्यात खोकरी ते आगरदंडा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर दोन वाहने आली की अडथळा निर्माण होतो. त्यात या रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्ट्या अतिशय खोलगट झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुचाकीस्वारांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावर रोजच एकातरी दुचाकीस्वाराचा अपघात होत असतो.
मुरुड-आगरदांडा रस्त्यावर खोकरीपासून आगरदांड्यापर्यंत एक ते दोन फूट खोल साईडपट्ट्या झाल्या असून, त्या लवकरात लवकर भरण्यात याव्यात व या ठिकाणी अतिशय अरुंद रस्ता आहे त्याचे रुंदीकरण व्हावे तसेच या रस्त्यावर जुन्या गतिरोधकांबरोबर नव्याने गतिरोधकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत न होता ना प्रवासास विलंब होत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेऊन या रस्त्यावरील साईडपट्ट्या भरण्यात याव्यात व वाढीव गतिरोधक हटविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांकडून जोर धरीत आहे.