| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे खूपच खराब झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पहिले दोन्ही सामने गमावले. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वीच हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले होते, त्यानंतर रोहित शर्माच्या आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.
इतकंच नाही तर जेव्हा हार्दिक पांड्या आयपीएलचा पहिला सामना खेळायला आला तेव्हा मैंदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनीही त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याचे समोर आले. याचदरम्यान आता आयपीएलमध्ये समालोचकाची भूमिका बजावणारे नवज्योतसिंह सिध्दू यांनी सोशल मीडियावर रोहित शर्मासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हत्ती धुळीने माखलेला असला तरी त्याचा सन्मानच केला जातो. नवज्योतसिंह सिध्दू यांच्या या पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत.