। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पनवेल, वावंजे परिसरात नागरिकांनी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. अरीवली-आष्टे पाठोपाठ वावंजे परिसरात नागरिकांना बिबट्या दिसल्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांना अरिवली-आष्टे परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यातच वावंजे परिसरातील ग्रामस्थांनाही बिबट्या दिसून आला. बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बिबट्या स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अरीवली परिसरातील बिबट्या वावंजे परिसरात आला असेल असे सांगितले जात आहे. या परिसरात हाजी मलंग डोंगरदेखील असून हा भाग जंगलमय आहे. त्यामुळे येथे बिबट्या शिकारीसाठी आला असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.