जिल्हाभर पक्ष्यांचा किलबिलाट; पक्षी निरीक्षकांसाठी मोठी पर्वणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
समृद्ध जंगल, विविध भूभाग, पाणथळ क्षेत्र, 240 किमीचा विस्तृत सागरी किनारा व निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या रायगड जिल्ह्यात पक्ष्यांच्या जवळपास 350 प्रजाती सापडतात. सध्या जिल्ह्यात स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची रेलचेल पहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक सुखावले आहेत. नुकतेच अलिबाग तालुक्यातील सारळ खाडीकिनारी रेड नॉट या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले. ही नोंद महाराष्ट्रातील तिसरी व जिल्ह्यातील पहिली नोंद आहे. म्हणजेच, आत्तापर्यंत महाराष्ट्रात हा पक्षी तिसऱ्यांदा दिसला आहे, असे बहराई फाऊंडेशनचे पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते मार्च हा काळ पक्षी निरीक्षणासाठी पर्वणी समजला जातो. सध्या थंडीदेखील चांगली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित व स्थानिक पक्षी मनमुराद बागडत आहेत. काही दिवसांनी स्थलांतरित पक्षी परतीच्या मार्गाला लागतील, तर काहींचे स्थलांतर सुरू आहे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी येथील पक्षी निरीक्षण क्षेत्र गजबजली आहेत. पक्ष्यांसह पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी ही क्षेत्र हॉटस्पॉट ठरत आहेत.
सर्वसामान्यांनादेखील या रंगीबेरंगी पक्ष्यांना पाहून तसेच त्यांचा किलबिलाट एकूण आनंद होताना दिसत आहे. पक्षी निरीक्षणासाठी हॉटस्पॉट असलेली जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, उरण व पनवेल येथील समुद्र, खाडी किनारे, कांदळवने, पाणथळ जागा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुरुड येथील फणसाड अभयारण्य, माणगाव, श्रीवर्धन, महाड, म्हसळा आदी ठिकाणे आहेत. अनेक देश-विदेशातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी येथे सध्या उत्तम हवामान व वातावरण आहे. तसेच मुबलक खाद्यदेखील मिळते. परिणामी परदेशी व स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर आले आहेत. अलिबाग येथील आक्षी आणि रेवस येथील समुद्रकिनारा खाडी प्रदेश 60 हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. राम धरणेश्वर येथे 30 हून अधिक गरुडवर्गीय शिकारी पक्षी आढळतात. एकाच ठिकाणी इतक्या प्रजाती आढळणारे हे एकमेव ठिकाण आहे. सागरगड, सिद्धेश्वर, कनकेश्वर येथे अनेक प्रकारच्या वृक्ष प्रजाती व पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास आहे. श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव-पाटणूस येथे पांढऱ्या पाठीची व इतर प्रकारची गिधाडे आणि इतर पक्ष्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुरुड येथील फणसाड अभयारण्य येथे 190 प्रकारचे पक्षी आढळतात. महाड, माणगाव, पाली, सुधागड, कर्जत व माथेरान समुद्र पक्षी वगळून इतर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर स्थलांतरित तिबोटी खंड्या संपूर्ण जिल्ह्यात आढळतो. नुकतेच पाटणूस येथील पक्षी निरीक्षक राम मुंडे यांनी पाटणूस जंगल भागांमध्ये दोन गिधाड्यांच्या घरट्यामध्ये अंडी पाहिली आहेत. त्यामुळे लवकरच या अंड्यातून पिल्ले बाहेर येतील. यामुळे येथे पक्षी क्षेत्र बहरत आहे.
पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. दमट हवामान, पानगळीची जंगले पक्ष्यांसाठी विविध अधिवास, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, समुद्र आणि खाडीकिनारी असलेली कांदळवने, सदाहरित, निमसदाहरित व पानगळीची जंगले असे समृद्ध वातावरण व अधिवास पक्ष्यांच्या वाढ व विकासासाठी लाभदायक आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात विविध प्रकारचे असंख्य पक्षी राहात आहेत, असे पक्षी निरीक्षक प्रवीण कवळे यांनी सांगितले.
दुर्मिळ प्रजातीचे दर्शन या भागात दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शनदेखील होते. त्यामध्ये थोरला धनेश (Great Pied Hornbill), मलबारी धनेश (Malabar Pied Hornbill), राखी धनेश (Indian Greay Hornbill), मलबारी करडा धनेश (Malabar Grey Hornbill) यांचा समावेश आहे. तसेच दुर्मिळ पांढऱ्या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे येथे आहेत. या पक्ष्यांबरोबर आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल (Yellow footed green-pigeon) देखील सर्वत्र आढळतो. सिस्केप संस्थेचे गिधाड संवर्धन काम येथे प्रभावीपणे सुरू आहे.
देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. अमूर ससाणा याबरोबरच ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर, ठिपकेवाली तुतारी, काळ्या डोक्याचे भारीट, तिबोटी खंड्या, फ्लेमिंगो व हिमालयन बुलबुल व इतरही देशी व विदेशी प्रवासी व स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील विविध भागात दाखल होतात. विशेष म्हणजे, औद्योगिकीकरणामध्येदेखील येथील जैवविविधता टिकून आहे, असे पक्षी अभ्यासक राम मुंडे म्हणाले.
रेड नॉट दुर्मिळ पक्ष्याचे पहिल्यांदा दर्शन अलिबाग तालुक्यातील सारळ समुद्रकिनारी रेड नोट (लाल जलरंक) या दुर्मिळ पक्ष्याचे पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांना नुकतेच दर्शन झाले असून, तशी नोंद त्यांनी केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एका नवीन पक्ष्याची भर पडली आहे. अलिबाग येथील पक्षी निरीक्षक प्रवीण कवळे यांनादेखील रेवस खाडीकिनारी हा पक्षी काही दिवसांपूर्वी दिसला आहे. रेड नॉट याचे शास्त्रीय नाव कॅलिड्रीस कॅनट्स असे आहे. हा पंचवीस सेमी आकाराचा लहान पक्षी आहे. त्याचे वजन 100 ते 200 ग्रॅम एवढेच असते. स्थलांतरादरम्यान हे मोठ्या थाव्यामध्ये दिसून येतात. या थव्यामध्ये एकाच वेळी दहा ते वीस हजार रेड नॉट पक्षी असण्याची शक्यता असते. सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत रेड नॉट पक्ष्याचा समावेश होतो. साधारण हे पक्षी कमीत कमी दहा हजार किलोमीटरपर्यंत स्थलांतर करतात. हा पक्षी उत्तर अमेरिकेत विण करतो, तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये हिवाळी स्थलांतर करतो. तसेच आर्क्टिकमध्येही या पक्ष्याची विण होते आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते हिवाळी स्थलांतरासाठी जातात, असे पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात जवळपास 29 प्रकारचे पक्षी पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ मलबारी व राखी धनेश, निलगिरी रानपारवा, करड्या डोक्याची मैना, पांढऱ्या गालाचा कुटूरगा आदी. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल तर त्याचे संवर्धन व जतन करण्याची गरज आहे.
प्रवीण कवळे,
प्रसिद्ध पक्षी निरीक्षक
पश्चिम घाट निसर्ग, समृद्ध पाणथळ क्षेत्र व जैवविविधतेने रायगड जिल्हा नटलेले आहे. शिवाय कांदळवने विपुल व समृद्ध आहेत. त्यामुळे येथे देशी विदेशी पक्ष्यांना अनुकूल अधिवास मिळत आहे. याबरोबरच वनविभाग तसेच निसर्गप्रेमी संस्था, पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्यामुळे पक्ष्यांचा अमूल्य ठेवा टिकून आहे.
समीर शिंदे,
वनक्षेत्रपाल,
कांदळवन, अलिबाग