वाशिष्ठी खाडी किनारी परदेशी पक्षांचे दर्शन

मुंबई, पुण्यातील निरीक्षक चिपळुणात ; अनेकविध पक्ष्यांचा किलबिलाट


| चिपळूण | वृत्तसंस्था |


दरवर्षीचे आकर्षण असलेले सीगल, फ्लेमिंगो चिपळूणच्या खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. सीगलचे थवेच्या थवे वाशिष्ठी खाडी किनारपट्टीवर भिरभिरू लागले आहेत. परदेशी पाहुण्यांचा मुक्त संचार आणि त्यांच्या किलबिलाटाने वाशिष्टी खाडी किनारे गजबजून गेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एक आगळी पर्वणी मिळाली आहे. या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी अनेक पक्षी निरीक्षक मुंबई, पुण्यातून चिपळूणमध्ये दाखल होत आहेत.

मोठ्या शहरातील पक्षी निरीक्षक सुट्टीच्या दिवशी चिपळुणात येतात. खाडीकिनाऱ्यांवरील गावांमध्ये अनेक ठिकाणी राहण्याची सोय आहे. त्या ठिकाणी मुक्काम करून पहाटे पक्षी निरीक्षणासाठी जातात. गोवळकोट, कालुस्ते, मालदोली, केतकी, गांग्रई, करबंवणे खाडी किनारी हे पक्षी आढळत आहेत. किनारपट्टीवरील इतर पक्ष्यांमध्ये पाणकोंबडी, विविध बदके व बगळे, काळा शराटी, करकोचा, सीगल, चक्रवाक अशा देश-विदेशातील विविध पक्ष्यांनी समुद्र किनारपट्टी हळूहळू गजबजू लागली आहे. या पक्ष्यांपैकी 60 ते 70 जातीचे पक्षी स्थलांतरित आहेत. तुरेवाला सर्पगरूड, खरूची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी, जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होले असे अनेक मोठे पक्षी, देखणा मोर हे इथले स्थायिक पक्षी आहेत. त्याबरोबरच स्वर्गीय नर्तक आणि शामा हे तर पक्षीप्रेमींसाठींचे इथले आकर्षणच. तिबोटी खंड्या, सुभग, चष्मेवाला कोतवाल, नाचण, दयाळ चातक, पावश्या, राखी वटवट्या, तांबट, कुरटुक, शिंजीर, रनकस्तूर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार असे अनेक पक्षी येथे आहेत.

या पक्ष्यांची चाहूल सर्वांना मोहून टाकणारी आहे. हे पक्षी किनाऱ्यांवर आणि पाण्यात वावरत असतात. मेपर्यंत किनाऱ्याची सोबत करतात. पावसाची चाहूल लागताच हे पक्षी पुन्हा माघारी फिरतात. सुमारे सात ते आठ महिने त्यांचा मुक्काम या किनाऱ्यावर असतो. ओहोटीच्या वेळी बाहेर पडणारे छोटे मासे, कीटक, छोटे खेकडे हे त्यांचे प्रमुख अन्न असते. दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शन होत आहे. त्यामध्ये थोरला धनेश, मलबारी धनेश, राखी धनेश, मलबारी करडा धनेश यांचा समावेश आहे.

Exit mobile version