पक्ष्यांकडून पावसाच्या आगमनाचे संकेत

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील निसर्गातील विविध पक्षी, कीटक, प्राणी यांना पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असून येथील बहुसंख्य पक्षांची घरटी बांधून पूर्ण झाली आहेत. मुंग्यांनी देखील आधीच रसद गोळा करून ठेवली आहे. वारुळाची म्हणजेच वाळवीची घरांची दुरुस्ती पूर्ण करून ठेवली आहे.

माथेरान हे पर्यटनस्थळ असून येथील असलेल्या भरगच्च जंगलामुळे, आल्हाददायक वातावरणामुळे आणि येथील जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहे. माथेरान मधील जंगलात असंख्य पशु, पक्षी, प्राणी, कीटक आहेत. या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या माथेरान मध्ये निसर्गमित्र संस्था काम करीत असते. या संस्थेचे अध्यक्ष पवन गडवीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येथील पशू-पक्ष्यांना पावसाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येथील जंगलात भटकंती करीत असतात अशा अनेक घटनांच्या नोंदी त्यांनी येथे केल्या आहेत. पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पक्षांनी लवकर घरटी बांधून पूर्ण केली आहेत. बुलबुल, कोकिळा, टिटवी, कुकुटकुंभा, कावळा यांचे तर अंडी उबवण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच काही पक्षांची पिल्ले घरट्यातून बाहेर देखील पडू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी माथेरानच्या मुख्य बाजारपेठ येथील एका झाडावरून कोकिळेचे पिल्लू हवेत उडण्याचा प्रयत्न करताना सारखे रस्त्यावर पडत होते. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी आणि नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच मुंग्यांची सुद्धा खाणे साठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून वाळवीची वारुळे देखील डागडुजी करून पूर्ण झाली आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की चातक पक्षी ‘पिऊ पिऊ’ असे ओरडू लागला की समजावे पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले. कावळीणीने किती अंडी दिली आहेत. यावरून सुद्धा पावसाचा अंदाज लावला जातो. चार अंडी दिली तर चांगला पाऊस, दोन अंडी दिली तर कमी पाऊस आणि एकच अंड दिलं तर अतिशय कमी पाऊस पडणार असे संकेत मिळतात. जंगलात झाडे पोखरणार्‍या वाळवीला कधी पंख फुटत नाहीत परंतु, पावसाळ्यापूर्वी वारुळातून थवेच्या थवे उडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पक्षी, किटक यांच्या विशिष्ट हालचालींवरून माथेरानच्या डोंगरमाथ्यावर यंदा पावसाचे आगमन लवकर होणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version