नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांची माहिती
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपरिषदेची विशेष सभा 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्याची माहिती नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे उपस्थित होते.
नगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले की, दिव्यांग नागरिकांच्या पेन्शनमध्ये गेल्या पाच वर्षांत वाढ झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन दरमहा 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांना शास्तीमध्ये 50 टक्के सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 161 अर्जदारांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक शास्ती माफी देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उमरजी पटेल नगर येथे श्रीराम मंदिराजवळ सामाजिक सभागृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली. गगनगिरी महाराज आश्रमाकडे जाणारा अरुंद रस्ता 18 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दुभाजकावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सीएसआर निधीतून शहरातील शाळांमध्ये सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येणार आहे. तसेच नळजोडणी करताना रस्ता खोदकामाचा खर्च नागरिकांवर टाकला जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण दिलासादायक भूमिका नगरपरिषदेकडून घेण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिफारसीनुसार विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. सभेत घेतलेल्या सर्व निर्णयांना नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल नगराध्यक्ष शेंडे यांनी आभार व्यक्त केले.







