रायगड काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; एक व्यक्ती,एक पदची अंमलबजावणी

I अलिबाग I अतुल गुळवणी I
रायगड जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचे सुतोवाच जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे. उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठरावानुसार जिल्ह्यात एक व्यक्ती, एक पद ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

देशभरात मरगळलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच एक व्यक्ती, एक पद या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हास्तरापासून दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे शिर्डी येथे चिंतन शिबीर सुरु आहे. तेथे रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हे सहभागी झालेले आहेत. तिथून कृषीवलशी बोलताना त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार रायगडातही प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.

रायगड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पण सध्या तशी परिस्थिती नाही हे वास्तव आहे.तरीही पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही नव्या जोमाने,दमाने कामाला लागलेलो आहोत.जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रत्येक तालुक्याचा दौरा करुन तेथील कार्यकारिणीत आम्ही कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार बदल केलेले आहेत. आता तर प्रदेश आणि राष्ट्रीय नेत्यांच्या सुचनेनुसार ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पदे आहेत त्यांचे राजीनामे घेणार आहोत. शिवाय 50 वर्षाखालील नेतृत्वाला पक्षात काम करण्याची संधीही देणार आहोत. त्यासाठी येत्या 11 ते 16 जून दरम्यान रायगडात ठिकठिकाणी बैठका आयोजित करुन त्या धोरणांची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याचे घरत यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version