जंजिरा पर्यटनासाठी लवकरच खुला होण्याचे संकेत

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात शासनाकडून बंद केले जातात. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून, वातावरणही चांगलं असल्याने आता पर्यटकांना प्रतिक्षा आहे ती किल्ल्याचे दरवाजे उघडण्याची. तरी, शासनाने पर्यटकांचा विचार करुन लवकरात लवकर ऐतिहासिक जंजिरा किल्ला सुरू करावा, अशी मागणी सर्वच स्तरांवर होत आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरुन पर्यटकांची ने-आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून, जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो आणि व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होते.

पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, येत्या 30 ऑगस्ट या दिवशी किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील. परंतु, ते साफसफाईकरिता संपूर्ण किल्ला स्वच्छतेकरिता पंधरा दिवस तरी जातात. तोपर्यंत मेरीटाईम बोर्डचाही पत्रव्यवहार होईल. साधारण 15 सप्टेंबरपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला होईल. तरीही वातावरण पाहून किल्ला सुरु करु, अशी माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

Exit mobile version