ठेकेदाराकडून समाधानकारक कामे मार्गी लागण्याची चिन्हे

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील एक नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून काही दिवसांपासून सांडपाणी मलनि:स्सारणची कामे सुरू आहेत. त्यासाठी नगरविकास खात्याकडून पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माथेरान या सुंदर स्थळासाठी हा एक महत्वकांक्षी प्रकल्प असून याच माध्यमातून येथील सांडपाण्याचा निचरा होऊन हे पाणी पुन्हा सुयोग्य पद्धतीने उपयोगात आणले जाणार आहे.

या कामात मलनि:स्सारण पाईपलाईन जोडणी करताना विविध ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यातच काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला आहे. अशाच द्विधा मनस्थितीत सुज्ञ मंडळींच्या मागणी नुसार प्रथमतः जिथे जिथे रस्ते खोदले गेले आहेत. त्याठिकाणी पुन्हा एकदा काढलेले क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यासाठी सुरुवात झाली असून जोपर्यंत खोदलेल्या रस्त्यावर उत्तम प्रकारे क्ले पेव्हर ब्लॉक लावले जात नाहीत. तोपर्यंत कुठेही रस्ते खोदण्यास घेऊ नये असे सूचित केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने त्याचप्रमाणे कामाला गती देऊन नियोजनबद्ध कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे कामाच्या सुरुवातीला ज्या त्रुटी लोकांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी संबंधीत ठेकेदारानी संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित केले असून सद्यस्थितीत कामे चांगल्या दर्जाची होत असल्याने गावाचे हित पाहणार्‍या मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.

एसटीपीकामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला अठरा महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यानुसार त्यांनी टिकाऊ कामे कशाप्रकारे होतील याकडे लक्ष वेधले आहे. नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी सुध्दा कामात काही त्रुटी दिसत असल्यास त्या वेळीच निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. या चांगल्या पद्धतीने होत असणार्‍या प्रकल्पास कुणीही नाहक आडकाठी आणू नये,आपल्या गावाची ही आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन अन्य काही विकासात्मक कामे शासनाच्या वतीने कशी येतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वसंत कदम
अध्यक्ष, शिवगर्जना मित्र मंडळ,
माथेरान
Exit mobile version