अश्‍वपालकांच्या संपाने माथेरानमध्ये सन्नाटा; पर्यटकांचे हाल

पालिकेकडून पाहणी; संप मागे घेण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान येथे सुरू असलेले अश्‍वपालक यांचे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन बुधवारी तिसर्‍या दिवशी देखील सुरूच आहे. यामुळे नेहमी घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरुन जाणार्‍या माथेरानमध्ये सन्नाटा पसरला असल्याचे जाणवत आहे.


नगरपरिषदेने आणि अश्‍वपालक यांचे प्रतिनिधी यांनी सात पॉइंट सर्कलची पाहणी केली. तर या संपामुळे माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होत असून कुटुंबासह पायपीट करणार्‍या पर्यटकांचे हाल होत आहेत. पर्यटकांचा वाहतुकीचा पर्याय असलेल्या घोड्यांना नव्याने बनविण्यात आलेल्या आणि येत असलेल्या पर्यावरण पूरक धूळ विरहित रस्त्यावरून पाय घसरून अपघात होत आहेत. क्ले पेव्हर ब्लॉकमुळे बनविण्यात आलेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावरून अनेकदा घोडे पाय घसरून जखमी झाले आहेत. काही घोड्यावरून घसरून पर्यटक जखमी झाले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेवून माथेरान मधील स्थानिक अश्‍वपाल संघटना आणि मूलनिवासी अश्‍वपाल संघटना यांनी दि.20 पासून घोडे बंद आंदोलन सुरू केले आहे. या दोन्ही संघटना आंदोलन सुरू केल्याने मागील दोन दिवसात 460 पैकी एकही घोडा रस्त्यावर आला नव्हता. पर्यटन स्थळांवर निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेवून माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी अश्‍वपालक यांच्या सर्व तक्रारी बद्दल पालिकेची भूमिका स्पष्ट केली होती. ते पत्र (दि.21) पालिकेकडून दोन्ही अश्‍वपाल संघटना यांना देण्यात आले होते.


पालिका प्रशासक सुरेखा भणगे आणि नगर अभियंता स्वागत विरंबोळे यांनी अश्‍वपाल संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत सात पॉइंट सर्कलची पाहणी केली. त्यात सात पॉइंट सर्कल मधील प्रबळ हाऊस, ब्राईटलांड हॉटेल आणि इको पॉइंट या भागात फिरून सर्व तीव्र उताराच्या रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी अश्‍वपाल संघटना अध्यक्ष आशाताई कदम, सचिव विकास रांजाने, मूलनिवासी अश्‍वपाल संघटना संतोष शिंगाडे हे या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. मात्र कोणताही निर्णय मिळाला नसल्याने अश्‍वपालक यांनी तिसर्‍या दिवशी देखील एकही घोडा पर्यटक यांच्यासाठी बाजारात आणला नाही. बहुतेक घोडे हे अश्‍वपालक यांच्या तबेल्यात बांधून ठेवण्यात आले आहेत. सर्व अश्‍वपालक हे माथेरान मधील श्रीराम चौकात घोडे बंद आंदोलन करताना दिसून येत आहेत. सलग तिसरा दिवस असून माथेरान मधील वाहतुकीचे साधन असलेले घोडे हे पर्यटकांसाठी सेवेसाठी बाहेर रस्त्यावर आले नाहीत. तर दुसरीकडे या संपमुळे माथेरानमध्ये आलेले पर्यटक यांचे मोठे हाल होत आहेत.

तीव्र उताराच्या रस्त्यावर घोड्यांचे पाय घसरत असतात आणि घोड्यांना अपघात होत असतात. एका घोड्याची किंमत ही पन्नास हजार हून अधिक असून लाखांपर्यंत असते. त्यामुळे मुक्या जनावराल होणारी जखम ही नकोशी वाटते आणि म्हणून हे बदल करण्यात यावेत.

संतोष शिंगाडे, अध्यक्ष मूलनिवासी अश्‍वपाल संघटना

नगरपरिषदेचे मत
अश्‍वपाल संघटना यांनी वखार नाका ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या भागातील रस्ता क्ले पेव्हरच तयार करू नये अशी मागणी केली आहे. मात्र हा रस्ता विरहित करावा असा पालिकेचा 19/4/2019 चा ठराव आहे आणि 21/7/2020 रोजी हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावा, असा ठराव पालिकेने केला आहे. त्यात सनियंत्रण समितीने देखील क्ले पेव्हर ब्लॉकचा बनविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यात कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. दूसरीकडे याच रस्त्यावर माथेरान अधिनियम 1959 चे कलम मध्ये वखार नाका ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या भागात जलदगतीने घोडे चालविण्यास बंदी आहे. त्यामुळे त्यावरील आक्षेप चुकीचं असल्याचे पालिकेने अश्‍वपाल संघटना यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सात पॉइंट सर्कल बद्दल निविदा मागविल्या आहेत
माथेरान मधील सात पॉइंट सर्कल वरील तीव्र उताराच्या रस्त्यावर जांभा दगड लवण्यासाठी यापूर्वीच पालिकेने निविदा मागविल्या आहेत. अश्‍वपाल संघटना यांच्या मागणीनुसार त्या सर्व ठिकाणी क्ले पेव्हर ऐवजी जांभा दगड लावले जातील आणि ती कामे होतील. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात यावेत.

Exit mobile version