वादळामुळे समुद्रात सन्नाटा

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुडच्या समुद्रात कोलंबीची मोठी लॉटरी लागली असली तरी अचानक भाव कोसळल्याने मच्छिमारांना मोठ्या फायद्यापासून मात्र वंचित राहावे लागले आहे. कोलंबी मोठ्या प्रमाणावर आल्याने कोलंबीचे किलोचे भाव 40 ते 50 रूपयाच्या खाली आले आहेत. एरव्ही हाच भाव 100 रूपये किलो असतो. कधी न येणार्‍या अरबी समुद्रात वादळांची मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मासळीच्या ऐन सिझनमध्ये वादळे येत असल्याने मच्छीमारांचे दुहेरी नुकसान होत आहे. निसर्ग, तौक्ते, गुलाब, शाहीन अशा वादळांनी कोकणातील मासेमारी नेस्तनाबूत केली आहे. सतत वादळी वातावरणाचा मासेमारीवर मोठा परीणाम झाला असून मासेमारी सातत्याने ठप्प होत आहे. हा कोलंबी बरोबच पापलेटचा सिझन आहे. मात्र बुधवारी मार्केटमध्ये पापलेट फारसे दिसून आले नाहीत. जी पापलेट उपलब्ध होती, त्या जोडीचा भाव 800 रूपये होता. वादळाच्या शक्यतेमुळे कोलंबीसाठी समुद्रात गेलेल्या नौकांनी किनार्‍याकडे धूम ठोकली असून बुधवारी दुपारी समुद्रात दूरदूर सन्नाटा दिसत होता. गेल्या 8 दिवसांपासून कोलंबी भरपूर मिळत असली तरी भाव कोसळल्याने फारसा फायदा मच्छीमारांना झालेला दिसून येत नाही. यंदा वादळांनी सुरुवातीलाच संकटांची मालिकाच सुरू केली असून मासेमारीस हा धोक्याचा सिग्नल असल्याचा भावना मुरूड आणि एकदरा जेटीवर मच्छीमारांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version