मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात मूक आंदोलन


लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणप्रश्‍नी भूमिका मांडावी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी हे आंदोलन झाले.

पावसाची संततधार असतानाही राज्याच्या विविध भागातील मराठा महासंघाचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचले. स्थानिक कार्यकर्त्यांनीही गर्दी केली.आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. या मूक आंदोलन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, युवराज मालोजीराजे छत्रपती हे सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात मूक आंदोलन होते. सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरु होता. अशाही स्थितीत छत्री, रेनकोट घेऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. भर पावसात आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनीही बैठक मारून आंदोलनात सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या आंदोलनाकडे येत होते. लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणप्रश्‍नी भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनस्थळी होती. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतामध्ये मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वस्त केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या आंदोलनाचे रणशिंग कोल्हापुरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून फुंकले जात असून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामधूनही या आंदोलनाची मशाल धगधगत आहे. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, संभाजी नगर, अमरावती, आणि कोकण असे पाहिल्या टप्प्यात आंदोलने होतील.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या नंतर पुणे लाल महाल ते मुंबई विधान भवन लाँग मार्च होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या जिल्ह्यात आंदोलन होईल त्यानंतर तिथेच लाँग मार्चच्या तयारीसंदर्भात प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत बैठक पार पडेल.

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केलं. आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केले.

Exit mobile version