मोर्चासह भीक मांगो आंदोलनाचा प्रयोग
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
। चिपळूण । प्रतिनिधी ।
पूरमुक्त चिपळूणसाठी चिपळूण बचाव समितीतर्फे करण्यात येत असलेले साखळी आंदोलन अधिकाधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला असला तरी, शासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही किंवा तत्सम कृती करण्यात आलेली नाही.
यामुळे दिवसागणिक अधिकाधिक प्रमाणात जनसहभाग लाभत असलेल्या या आंदोलनात विविध प्रयोग करण्यात येत आहेत. नुकताच या आंदोलनकांना संपूर्ण चिपळूण शहरात भीक मांगो आंदोलन केले. तर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात काळ्या रंगाचे कपडे परिधान करीत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. आतातरी शासनाने भूमिका घ्यावी, अन्यथा हे आंदोलनाचे स्वरुप उग्र करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्ध्वस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे, हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उद्ध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, यास शासन वा प्रशासनाकडून आवश्यक तो प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण बचाव समितीने प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, या उपोषणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे
यानुसार संपूर्ण चिपळूण शहरातून भीक मांगो आंदोलन करण्यात आले असून, यास शहरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. तर नाईक कंपनीच्या येथून मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चात संपूर्ण जमावामध्ये काळ्या रंगातील पेहराव, मास्क, रिबीन, टोप्या लक्ष वेधून घेत होत्या. तर गाळ काढा चिपळूण वाचवाच्या घोषणांनी सर्वत्र हाहाकार करण्यात येत होता. हा निषेध मोर्चा शहरातून बाजारपेठ मार्गे शिवजीचौक, मार्कंडी पेट्रोल पंप ते प्रांत कार्यालय असा काढण्यात आला.मोर्चाच्या समाप्तीअंती समितीतर्फे जनसभेला संबोधित करण्यात आले. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.
- वाशिष्ठी नदीतील गाळाचे गांभीर्य सरकारला लक्षात यावे, यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सेवानिवृत्त शासकीय अधिकार्यांची एक समिती तयार करून गाळ काढण्याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. – संजय चव्हाण, नागरिक, चिपळूण