लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चक्क असे काही केले…

। माथेरान । माथेरान ।
माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी झाल्यानंतर आता ई-रिक्षा येणार या भीतीपोटी येथील अश्‍वपाल संघटना आणि मूळवासीय अश्‍वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरान नगरपालिकेवर मुकमोर्चा काढण्यात आला. आपल्या व्यवसायावर ई-रिक्षाचा गंभीर परिणाम होईल आणि आपला परिवार देशोधडीला लागेल या चिंतेत अश्‍वपालक असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला.

3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता येथील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर चौकातून पूर्ण परिवारासह भर पावसात या मुकमोर्चाला सुरुवात झाली.संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम,उपाध्यक्ष सचिन पाटील,माजी नगराध्यक्षा वंदना शिंदे तसेच सर्व अश्‍वचालक व त्यांचे परिवार या मोर्चामध्ये सामील झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने 27 जुलै रोजी ई-रिक्षा चाचणी घेण्यात आली त्या रिक्षांमध्ये 3 ते 4 अधिकारी बसून दस्तुरी ते रेल्वेस्टेशन पर्यंत येत होते.हे पाहून अश्‍वपालकांच्या तोंडचे पाणी पळाले.त्यामुळे त्यांनी जागोजागी बैठका घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुकमोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा झाली.अश्‍व व्यवसाय हेच आपल्या परिवाराचा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्याने ई-रिक्षामुळे आपल्या रोजगारावर परिणाम होईल.या भीतीपोटी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथेरान नगरपालिकेवर मुकमोर्चा काढण्यात आला.

मुकमोर्चामुळे घोडेबंद
सर्व अश्‍वचालक मुकमोर्चामध्ये आपल्या परिवारासोबत सामील झाल्यामुळे घोडे बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना घोड्यावर रपेट मारता आली नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.

ई-रिक्षात 3 ते 4 पर्यटक एकवेळेस येणार त्यामुळे घोड्याच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊ शकते.40 टक्के लोक हे घोड्याच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात.यासाठी शासनाने घोडेवाल्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे यासाठी आम्ही मुकमोर्चा आयोजित केला. तसेच आता आमची कायदेशीर लढाई सुरू करण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे.

-आशा कदम, अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्षा
Exit mobile version